प्रवासी विठ्ठल
आपल्या आसपास अनेक गमतीशीर नाव असलेली मंदिर आहेत. पुण्यातील सांगायची झाली तर - भांग्या मारुती, पासोड्या विठोबा, अकरा मारुती, जिलब्या मारुती अशी अनेक गमतीशीर नाव असलेली मंदिर आहेत. तशीच ती अनेक ठिकाणीही आहेत. पण अश्या गमतीशीर वाटणाऱ्या नावं मागे काही इतिहास आहे, काही घटना आहेत तर काही मंदिरांच्या बाबतीत तर लोककथा आहेत असं दिसून येते.
आज आपण कोल्हापुरातील एका विठ्ठल मंदिराविषयी थोडी माहिती घेऊया. ते आहे , कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी जवळील प्रवासी विठ्ठल मंदिर. ह्या मंदिराचा उल्लेख हा करवीर माहात्म्यमध्ये येतो. यावरून ह्याचे प्राचीनत्त्व लक्षात येते. खर तर हे एकच मंदिर नसून मंदिर समूह आहे. ह्या मंदिर समूहात श्रीराम मंदिर, ओंकारेश्वर मंदिर म्हणजे शिव मंदिर, एकमुखी दत्त आणि हनुमान मंदिर आहेत. त्याच बरोबर आई वडिलांची सेवा करत असलेल्या भक्त आई-वडिलांसह पुंडलिकाची मूर्ती, गरुड, गोपालकृष्ण, कान्होपात्रा, नामदेवांच्या पादुका तर आहेत आणि शिवाय काही वैशिष्ट्यपूर्ण वीरगळही आहेत. ह्या मंदिराच्या जवळच एक विद्यालय, काही घर आहेत, कोल्हापूरची ओळख असणाऱ्या पाहिवानांना, कुस्तीगिरांना तयार करणारी एक तालीमही आहे. एका छोट्या गल्लीत हा मंदिर समूह आहे, जो बाहेरून बघितल्यावर लक्षात येत नाही.
हे मंदिर १२-१३ व्या शतकात बांधण्यात आले असून त्याच्या पुढील लाकडी सभामंडप हा नंतरच्या काळातील आहे. मंदिराची रचना हि मंदिर स्थापत्याच्या नियमानुसार आहे म्हणजे सभामंडप, अंतराळ , गर्भगृह अशी आहे. दगडी सोळखांबी सभामंडप , नंतर अंतराळ ,त्यानंतर गर्भगृह. ह्या गर्भगृहात विठ्ठल-रुक्मिणी-राही (सत्यभामा) अश्या तीन मूर्ती आहेत. पंढरपूरतील विठ्ठल मंदिराप्रमाणेच ह्या मंदिराची मंदिर रचना दिसून येते. विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रुक्मिणी आहे जिच्या उजव्या हातात कमळकळी तर डावा हात कंबरेवर आणि विठ्ठलाच्या उजाव्या बाजूला राही (सत्यभामा) असून हिचे दोन्ही हात कंबरेवर आहेत. ह्या दोहींच्या मधोमध उभा असलेल्या विठ्ठलाच्या उजव्या हातात पद्म असून तो हात वरद मुद्रेत आहे, डाव्या हातात शंख असून तो हात कमरेवर ठेवलेला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्याप्रमाणेच ह्याही विठ्ठलाच्या कानात मकरकुंडले आहेत. अजून एक वैशिष्ट्य असे की विठ्ठलाच्या मुकूटात शिवलिंग आहे, जे "विठोने शिरी वाहिला देवराणा। तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥ निवाला स्वये तापसी चंद्रमौळी। जिवा सोडवी राम हा अंतकाळीं॥" ह्या समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकाची आठवण करून देते. आता सगळ्यात महत्त्वाच्या वैशिष्ट्याविषयी - ते म्हणजे ह्या तिन्ही मूर्तीच्या पायातील वहाणा सदृश्य अलंकार. मुर्तीशास्त्रानुसार हा एक पायातील अलंकार आहे. पण पांडुरंगाचे भक्त त्या गोष्टीकडे आपल्या आपल्या श्रद्धेने पाहतात ते फारच रंजक ठरते. तिथे कोणी बुद्धी-शहाणपण लावायची गरज नसते, कारण हा पांडुरंग हा लेकुरवाळा देव आणि त्याचे भक्त ह्यातील ह्या गोष्टी आहेत. त्या त्यांच्या श्रद्धेच्या अनुसार आहेत. त्यामुळे त्या तश्याच पाहाव्यात.
पायातील चपलांमुळे काही आख्यायिका अशी आहेत - कोल्हापुरातील नंदवाळ ज्याची ओळख ही प्रती पंढरपूर आहे तिथून हा विठ्ठल प्रवास करत मिराजकर तिकटी , कोल्हापूर येथील ह्या मंदिरात येतो, नंतर पंढरपूरला जाऊन पुतहे तो हम्पी, कर्नाटक असा प्रवास करतो. तो प्रवास करतो म्हणून तो प्रवासी विठ्ठल आणि त्यामुळेच त्यांच्या पायात वहाणा आहेत. अजून एक मत असे आहे की, विठ्ठल सकाळी स्नान नंदवाळ येथे करून , दुपारचे भोजन कोल्हापुरातील ह्या मंदिरात करतो तर रात्री विठ्ठल हा पंढरपूरात जातो. तर काहींची श्रद्धा अशी आहे की, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पांडुरंग सकाळी नंदवाळ हून निघतो, दुपारनंतर मिराजकर तिकटी , कोल्हापूरातील ह्या मंदिरात येऊन रात्री बारापर्यंत विश्रांती घेतो आणि पुढे आषाढी एकादशीला भक्तांसाठी पंढरपूरला जातो. हा असा तो भक्तांसाठी करतो, म्हणूनच त्याच्या पायात वहाणा आहेत. काही भक्त असे मानतात की, जो भक्त पंढरपूर येथे जाऊन विठ्ठालाचे दर्शन घेऊ शकत नाही त्या भक्तांसाठी देवच पंढरपूरहून भक्तांसाठी प्रवास करून येथे आला आहे. आणि भक्त ह्या विठ्ठालाचे ह्या मंदिरात दर्शन घेतो. म्हणून भक्तांसाठी प्रवास करणार हा प्रवासी विठ्ठल त्याच्या पायात वहाणा आहेत. ह्या सर्वांमागे किती सुंदर अश्या भक्तांच्या भावना. पुढे जाऊन ह्या वहाणांचा संबंध हा कोल्हापुरच्या सुप्रसिद्ध अश्या चप्पलांशी जोडला जातो. कोल्हापुरी चप्पलांचा इतिहास खूप जुना आहे हे सांगण्यासाठी असेल कदाचित. पण एकंदरीतच खूपच मनाला भावणार.
अश्या ह्या वेगळेपण असणाऱ्या कोल्हापुरातील ह्या मंदिराला एकदा तरी भेट दिली पाहिजे. हो ना ? तर मग पुढील कोल्हापूर भेटीत ह्या मंदिराला नक्की भेट द्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा