गुढीपाडवा - एक संस्कार



नमस्कार. आज गुढीपाडवा. मराठी नवं वर्षाची सुरुवात. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. जसा हा हिंदू माणसासाठी नववर्ष, एक शुभ मुहूर्त, चैत्रपालवी इ. आहे. पण त्या बरोबरच गुढीपाडवा आपल्याला अनेक संस्कारांची शिदोरी देखील देतो. मग ते माणसाने आयुष्य जगावे कसे हे तर शिकवतोच पण रामायण, रामलीला, गीत रामायण, गुढी उभारणे ह्याही गोष्टी काही संस्कार करतात. 

निसर्ग चैत्री पाडव्याच्या रूपाने काय शिकवतो? 

मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते. चैत्रातील पहिला दिवस म्हणजे चैत्रा शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. चैत्रात निसर्ग जुने वस्त्रे टाकून नवी पालवी धारण करतो. ह्यातून जुनी मरगळ सोडून नवीन चैतन्य नसानसात भरून घेण्याचा एक संस्कार हा निसर्गाचं तर करत नसेल ना? जगताना येणारे वाईट अनुभव, ह्यातुन येणारी निराशा, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या, त्यातून येणारे दडपण, इ. घटक जगण्याचा वेग थोडा कमी करतात. जीवन भरभरून जगणं कदाचित मंदावू शकतात. थोडा जगण्याचा वेग कमी होतो. पण हेच कटू अनुभव, हेच ओझं, दडपण जर आपण टाकून दिल तर परत एकदा भरभरून जगात येईल. पुढे जाताना मागचं मागेच सोडून चालू लागलो तर पुढचा प्रवास हलकाफुलका सुखकर होईल. आणि हेच तर आपल्याला शिकवायला निसर्ग आपली जुनी पाने टाकून परत फुलायला तयार होतो. वैशाखाचा दाह सहन करायला तयार होतो. ताजातवाना होतो. जी पाने त्याला श्वास देतात पण तीच तर जीर्ण होऊन, श्वास घेण्यास त्रासदायक ठरत असतील तर ते टाकलेली बरी. आणि हेच चैत्रपालवीच्या रूपाने निसर्ग आपल्याला शिकवतो. 

रामलीला एक संस्कार 

चैत्रा शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी ह्या दरम्यान भारतभर रामलीला सादर केल्या जातात. हा एक नाट्य प्रकार. श्रीरामाच्या जीवनावर आधारित प्रमुख घटना ह्या नऊ दिवसात रात्री सादर केल्या जातात. पूर्वी म्हणजे साधारणपणे ३५-४० वर्षांपूर्वी पुण्यातही ठिकठिकाणी रामलीला सादर होत असत. पण कालौघात संख्या फारच कमी झाली आहे. पण महाराष्ट्रात कोकणात अजूनही रामलीला सादर होतात. भारतात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील अयोध्या, बनारस, वृदांवन येथे जास्त मोठ्या प्रमाणात रामलीला सादर होते. रात्री ९-१० वाजता सुरु होऊन उशीरापर्यंत चालते तर कधी कधी पहाटेपर्यंत चालू राहते. ह्या नाट्य प्रकारामुळे आपल्या रामायणात सांगितलेल्या आदर्श जीवनाचा संस्कार नकळत होतो. हि देखील संस्कार शिदोरी आयुष्याला वेगळा आयाम देते. सहज जाताजाता, ह्या नाट्यप्रकाराला जागतिक अमूर्त वारसा म्हणून २००८ साली मान्यता मिळाली. २००८ साली पहिल्यांदाच भारतातील अमूर्त वारसांची नोंद झाली आणि त्यात रामलीला ह्याला स्थान मिळाले. एक अभिमानाची गोष्ट आहे म्हणून सांगावेसे वाटले म्हणून सांगितले बास. 

रामायण - एक आदर्शवाद 

रामायण महाभारत हि दोन आर्षकाव्य. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण हे आदर्श जीवन कसे असावे हे सांगणारे आहे. सर्वार्थाने आदर्श जीवन कसे असावे हे सांगणारे, शिकवणारे रामायण. आदर्श पुत्रं, आदर्श बंधू, आदर्श पती इ. रामायणावरून कळते. असा आदर्शवाद हाही संस्कार एक संस्कार आहे. रामायण माहित नाही असा भारतीय मिळणे अशक्य. जगाला देखील याने भुरळ घातली. विविध भाषांमध्ये भाषांतर आहेत. भारतातही अनेक संतांनी आपापल्या भाषेत सांगितले आहे. 

गीतरामायण - एक मराठी संस्कार 

गीतरामायण ह्या काव्यग्रंथाने १९५५-१९५६ पासून मराठी मनावर एक संस्कार केला आहे. गुढीपाडवा म्हटलं कि मराठी माणूस नकळत गीतरामायण ऐकायला आतुर होतो. त्या गीतांच्या एका वेगळ्या विश्वात रमतो. रामायणातील ठळक प्रसंगावर गदिमांनी काव्यरचना केली तर सुरसाज चढवला आहे सुधीर फडके यांनी. याच पहिलं प्रसारण हे आकाशवाणी पुणे यावर झाले. पहिल्या दिवसापासून लोक आतुरतेने ऐकायला वाट पाहत. आणि आजही ह्या गीतांची जादू काही कमी झाली नाही. हाही एक वेगळा गीतातून होणार संस्कार म्हणावा लागेल. 

गुढी - विजय पताका 

नववर्षाबरोबरच विजयाची पताका बांधून म्हणजेच गुढी उभारतात. ब्रह्माने विश्वाची निर्मिती ह्याच दिवशी केली असा विश्वास आहे. श्रीराम प्रभूने चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले होते तो हाच दिवस. शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू देखील ह्याच दिवशी झाली. असा वेगवेगळया कारणाने महत्त्व असलेल्या दिवसाला गुढी उभारून आनंद व्यक्त केला जातो. नवीन वर्षाचे स्वागत केले जाते, नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. अश्या प्रकारे गुढीपाडवाने आपल्याला ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’, असं म्हणत नवं वर्षाचे स्वागत करायला शिकवले आहे. तर मग अगदी दोन्ही हात पसरून नवी आव्हाने, नवं आनंद स्वीकारू या आणि जुने टाकूया. आपल्याला जे चैत्रपालवीने शिकवले आहे. भारतीय सण-उत्सव हा आपल्या मनावर एक संस्कार करत असतात. 

गुढीपाडवा देखील आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो, त्या कोणत्या हे वाचण्यासाठी आवश्य वाचा 'गुढीपाडवा - एक संस्कार'. आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. वाचा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा