आली आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल
ह्या ओळी ज्येष्ठापासूनच मनात रुंजी घालू लागतात आणि मनाला ओढ लागते ती वारीची.
मी 2001 ते 2013 असे बारा तेरा वर्ष पुणे सासवड पायी वारी केली. मी वारीला कशी सुरुवात केली याची एक गंमत आहे. आमच्या व शेजारच्या बिल्डींग मधले काहीजण वारीला नियमित जात होते. एकदा त्यांची चर्चा ऐकून मी व माझ्या मैत्रिणींनी जायचे असे ठरवले. त्यांना सांगितले आम्ही येतो तुमच्याबरोबर. त्या ग्रुपमध्ये माझ्या दोन मैत्रिणींचे नवरे होते, जे नियमित गेले काही वर्ष वारीला जात होते, सगळ्यांनी होकार दिला, उत्साह वाढवला, पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. आम्ही नवख्या व ते अनुभवी. त्यांनी स्वतःच्या अनुभवानुसार आम्हाला सांगितले की पैसे, मोबाईल व शूज सॉक्स घाला; याशिवाय काहीही घेऊ नका अगदी छत्री, रेनकोट सुद्धा नको साधी पाण्याची बाटली पण नको. आणि वारकऱ्यांना देण्यासाठी आणलेलं सामान आहे त्याचा वाटप आपण फुरसुंगीलाच करू व रिकाम्या हाताने घाट चालू चढू, असं सांगितलं. पण आम्ही पैसे, मोबाईल, एक छोटी पाण्याची बाटली, पातळ असा पंचू आणि साधे शूज व सॉक्स घातले. नंतर सगळ्याचच ओझं व्हायला लागलं. त्यांच्या सल्ला पटला.
आपण ज्या वेळेस गाडीने जातो तेव्हा दिवे घाट संपल्यावर लगेच सासवड आले असं वाटतं पण प्रत्यक्षात झेंडेवाडी सासवड हे अंतर आठ-दहा किलोमीटर आहे. आमची गंमत झाली म्हणजे घाट चढून पालखीची वाट पाहत बसलो पालखी आली झेंडेवाडी चे विसाव्याला दर्शन घेतलं. आणि पुढे सासवडकडे निघालो. आधीचा चालणं नंतर घाट चढून आम्ही जो विसावा घेतला त्याने आमचं घात केला म्हणजे आम्हाला चालवतच नव्हतं. कसेबसे सासवड एसटी स्टँड मध्ये पोहोचलो आणि एसटीने पुण्याला परत आलो.
पुढच्या वर्षी आम्ही तयारीच बराच सुधार केला होता कारण मागील वर्षाचा अनुभव गाठीला होता म्हणजे आता
फक्त मोबाईल व पैसे एवढेच घेतले होते आणि फ्लोटर घातले होते. वारीत लवकर चालायला सुरुवात केली, घाटही लवकर चढलो आणि चांगली दोन तास विश्रांती घेतली. घाट चढल्यावर डाव्या बाजूच्या डोंगरावर जिथून पूर्ण दिवेघाट दिसतो त्या जागेवर आम्ही जाऊन पालखीची वाट पाहत बसलो. फार लांबून पालखी एखाद्या छोट्याशा टिंबासारखी दिसायची पण जसजशी पालखी जवळ यायची तसतशी ती व्यवस्थित दिसायला लागायची. नंतर शेवटच्या एका वळणावर आपल्याला पालखी दिसते
पण नंतर ती एका वळणात आत मध्ये जाते आणि आम्ही जिथे बसलेलो होतो, त्याच्या या उजव्या बाजूच्या टोकाला बसलेल्या वारकऱ्यांना पहिल्यांदा पालखी जवळ आलेली दिसते आणि एक माणसांची लाट तयार होते म्हणजे ज्यांना माऊली दिसते पालखी दिसते ते वारकरी टाळ वाजवत किंवा टाळी वाजवत माऊली माऊलीचा गजर करत नकळत उभे राहतात आणि आपणही पालखीचे दर्शन झाल्यावर कधी माऊली माऊली करत उभे राहतो हे कळत नाही. एक लाट तयार
होते. असा एक हेलकावा असतो जसा माणसांची एक लाट.
मग विसाव्याला म्हणून झेंडेवाडीला (घाट चढून चढले लगेचच) पालखी थांबते. आम्ही तिथेच दर्शन घ्यायचं घ्यायचो व पुढे चालू लागायचो. नंतरच्या वर्षी मात्र आम्ही आधी सासवड ते जेजुरी असं एसटीने जायचो. जेजुरीला पुण्याला यायला एसटीला कमी गर्दी असायची. असं एक-दोन वर्ष केलं पुणे ते सासवड पायी, सासवड ते जेजुरी व जेजुरी वरून स्वारगेटची एसटी पकडून परत. नंतर एकाच्या ओळखीने आम्ही एका ग्रुपमधल्या एकाची गाडी आदल्या दिवशीच बोपदेव मार्गाच्या तोंडाशीच सासवडमध्ये
लावायचो. आता एसटीचा संबंध संपला. शेवटपर्यंत हाच क्रम आमचा कायम राहिला. पण इथे एक अनुभव सांगावासा वाटतो तो म्हणजे आपण
जो पर्यंत वारीबरोबर असतो तोपर्यंत एक ताकद आपल्यात असते. पण जेव्हा आपण वारीतून बाजूला
होतो व आपल्या परतीच्या मार्गाला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येते कि आपल्यात ताकद
नाही. जी ताकद वारीत होती, वारीत नाचत, पळत, अभंगातील ओव्या म्हणत, टाळ्या वाजवत आपण
कधी लांबचा पल्ला पार केला हे कळत नाही. संपूर्ण वारीत पुणे ते सासवड हाच टप्पा लांब
पल्ल्याचा आहे व त्यात दिवे घाटासारखा अवघड घाट येतो. पण सगळं हसत, पळत, उद्या मारत पार करण्याची ताकद
वारकरी व त्यांची माउली देते. एक वर्ष जरी
आपण वारीत थोडा का होईना भाग घेतला कि पुढच्या वर्षी नकळत वेध लागतात.
ह्या वारीने काय नाही दिलं? खूप अनुभव गाठीला
बांधता आले. देवाला भेटायला काहीच बरोबर घेऊन जाऊ नये; नको त्या गोष्टीत जीव अडकू नये,
इ. हे सगळ ठीक आहे पण एक गम्मत अशी ज्याच मला अजूनही नवल वाटतं की एवढ्या या लाखोंच्या गर्दीत काही ठराविक वारकरी भेटतच भेटत. एक आजी होत्या चापून-चोपून नऊवारी नेसणाऱ्या, कंबर पट्टा घालणाऱ्या, डोक्यावर तुळस घेऊन भरभर चालणाऱ्या. एक मुंबईच्या नर्स आजी होत्या. एक आजोबा ज्यांची ओपन हार्ट सर्जरी झाली होती असे कितीतरी लोक नेहमी प्रत्येक वारीला भेटायचे. काय योगायोग होता कळत नाही. प्रत्येक वारीने खूप काही शिकले, ते लिहायला घेतलं तर एक छोटी लेखमाला तयार होईल.
खूप छान अनुभव लिहिला आहेस. मला पण शेवटी २०१९ पुणे सासवड करता आली. त्यानंतर आता बघू पांडुरंग कधी वारीला नेत्यांनी ते.
उत्तर द्याहटवाछान लिहिलं आहेस,या अनुभवावर छोटी लेखमाला लिहायला घे
उत्तर द्याहटवाछान वर्णन केलं आहेस मीही पुण्यात आल्यापासून चार पाच वर्ष वारी केली होती दिवे घाट सासवडचा माळ त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखा झाला धन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप छान वर्णन केले आहेस.. वारीला जायची ओढ लागली आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती
हटवाछान वर्णन केले आहे.
उत्तर द्याहटवा