पायी वारी पंढरीची - थोडी माहिती
आज बघता बघता पालख्या पंढरीला पोहोचल्या आपल्या विठूरायाला भेटल्या. वारकरी हे जास्त संख्येने शेतकरी आहेत. पण पेरणी करून
वारीच्या ह्या 15 ते 20 दिवसात शेत देवाच्या स्वाधीन करून विठुरायाच्या दर्शनाला हे पायी निघतात. इंद्रायणीत आंघोळ करून विठ्ठलाचे दर्शन घेऊन भक्त पुंडलिकाच्या पायावर डोकं ठेवतात आणि परतीच्या वाटेला लागतात. आता वारी विषयी थोडं
जाणून घेऊया.
वारी म्हणजे नियमित केलेले देवदर्शन किंवा तीर्थक्षेत्राला जाणे. पण महाराष्ट्रात वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्राच. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व संस्कृती परंपराच आहे आणि तो वारसा तेराव्या शतकापासून सुरु झाला व जो अजून चालू आहे. वारी करणाऱ्या व्यक्तीला वारकरी म्हणतात. वारकरी संप्रदायात लहान-मोठा, श्रीमंत-गरीब हा भेद नाही तसेच नामजपाने पुण्य मिळते हाच मुख्य भाव आहे. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म किंवा भागवत संप्रदाय असं म्हटलं जातं. काही वारकरी प्रत्येक एकादशी व व इतर महत्त्वाच्या
नित्यनियमाने पंढरपूरला जातात. विठ्ठलाच्या ओढीने, चंद्रभागेचे स्नान करण्याच्या ओढीने प्रत्येक वर्षी लाखो संख्येने आपल्या घरातील सर्व पाश तोडून वारकरी निघतात. त्यावरुन 'पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे' ह्या ओळी आठवतात.
भागवत संप्रदायात भगवंतांचे, देवाचे विस्मरण होऊ नये; सतत त्याच्या नावाचे जप व्हावे यासाठी गळ्यात तुळशीची माळ धारण केली जाते. तुळशीची माळ गळ्यात घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही. वारकऱ्याने काही नियम पाळावेत असा संकेत भागवत संप्रदायात
आहे - स्नान करून कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावावा; हरिपाठ करावा; संतांचे अभंग ओव्या म्हणाव्यात; संतसाहित्य वाचावे; देवाचे दर्शन करावे. हे सर्व नित्यनियमाने करावे असा भागवत संप्रदाय सांगतो. भागवत संप्रदायाप्रमाणे सात्विक आहार सदाचारी परमार्थ परोपकार भजन-कीर्तनात सहभाग पंढरपुर वारी या सर्वांचा समावेश होतो
पालखीचा इतिहास बघताना असं लक्षात येतं की ह्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे.
म्हणजे तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात.
संत श्रेष्ठ ज्ञानदेवाच्या घरात पंढरीच्या वारीची परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेखही सापडतो.
ज्ञानदेवाने पुढे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जाती-पातीतील समाजाला एकत्र करून,
त्यांना वारीच्या सोहळ्यात सामावून घेतले. जरी संत ज्ञानदेवामुळे भागवत धर्माचा, वारीचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रभर झाला तरीही या भागवत संप्रदायाचा भक्त पुंडलिक
आद्यप्रवर्तक आहे.
पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात झालेली
दिसते. वारीच्या
इतिहासाचे पुढील प्रमाणे महत्त्वाचे कालखंड पडतात - पहिला कालखंड म्हणजे भक्त पुंडलिकाचा काळ अर्थात ज्ञानदेव पूर्व काळ; नंतरचा काळ तो म्हणजे ज्ञानदेव नामदेव ह्यांचा काळ; त्यानंतरचा भानुदास एकनाथ यांचा काळ येतो; पुढे येतो तो
तुकोबांचा काळ आणि शेवटचा कालखंड म्हणजे तुकारामोत्तर काळ म्हणजे सोळाशे पन्नास नंतरचा तीनशे सत्तर वर्षांचा काळ. अशी भरपूर मोठी ऐतिहासिक- सांस्कृतिक परंपरा असलेली ही आपली पंढरपूरची वारी.
वारीच्या तश्या दोन परंपरा - एक म्हणजे पंढरपूरची पायी परंपरा आणि दुसरी म्हणजे दिंड्या पताकांसह पालखीची परंपरा. भक्त पुंडलिका पासून पुढे पायी वारीची परंपरा होती.
नंतर तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची ही परंपरा सुरू केली. ही संयुक्त पालखी सोहळाची परंपरा १६८० पासून ते १८३५ पर्यंत कायम होती. त्यानंतर हैबतबाबा आरफळकर जे शिंदे सरकाराच्या पदरी सरदार होते. त्यांनी स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. त्यांनी वेगवेगळ्या संस्थानिकांकडून मदत मागितली. नंतर पुढे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फक्त संत ज्ञानेश्वर
आणि संत तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत.
नंतरच्या काळात संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत जनार्दन, संत एकनाथ, संत सावता माळी, संत रामदास स्वामी, आणि संत कबीर यांच्या पालख्या पंढरपूरला दर्शनासाठी येत. पण पुढे पुढे विविध ठिकाणाहून पालख्या घेऊन येणे शक्य होत नसे. जसे उत्तरेकडील संत कबीर यांची पालखी घेऊन येणे शक्य होत नसे. त्यासाठी पर्याय म्हणून संत कबीर यांच्या अनुयायांनी कबीरांचे पालखीचे प्रतीक म्हणून हा पांढरा झेंडा त्यांनी पालखी सोहळ्यात दिला. आजपर्यंत पालखीत भगव्या पतकांबरोबर ही पांढरी पताका म्हणून फडकवली जाते.
या वारीचे साधारण तीन प्रकार आहेत - एक म्हणजे आषाढातली वारी; दुसरी ती कार्तिक महिन्यातील वारी आणि तिसरी म्हणजे प्रत्येक महिन्याला काही वारकरी हे नित्यनेमाने एकादशीला पंढरपुराला विठोबाच्या भेटीला जातात. आषाढाच्या वारीत सर्व संतांच्या पालख्या आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात तर कार्तिकी वारी सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरातून आपापल्या गावी जातात. असं सांगितले जाते कि ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा
संजीव समाधी घेतली होती तेव्हा स्वतः पांडुरंग उपस्थित होता. आणि दरवर्षी या प्रित्यर्थ आपल्या लाडक्या भक्ताला
भेटायला पंढरीनाथ आळंदी येतात अशी सर्व भक्तांची श्रद्धा आहे.
ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमीला देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तर ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपुरासाठी प्रस्थान ठेवण्यात येते. पालखीमध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या चांदीच्या पादुका पूजा करून ठेवल्या जातात. ज्ञानेश्वरांचा उल्लेख ‘माऊली’असा केला जातो.
संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदी ते पंढरपूर हा प्रवास
आळंदी - पुणे - सासवड - लोणंद - माळशिरस - वाखरी - पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते वाखरी येथे शेवटचे रिंगण होते तर संत तुकारामांची पालखीच देहू ते पंढरपूर हा प्रवास
देहू - पुणे – लोणी-काळभोर - यवत - वरवंड - बारामती - इंदापूर - अकलूज - वाखरी - पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते. वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.
वाखरीला दोन्ही संतांच्या
पालख्यांबरोबरच
बाकी सर्व संतांच्या पालख्यांच्या भेटी होतात.
वारीच्या प्रवासाच्या दरम्यान विविध कार्यक्रम असतात. वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर रोज कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम होतात म्हणजे वारी प्रमुख व त्याचे शिष्य यांचा समूह. वारकऱ्यांनी ज्याच्याकडून माळ घालून घेतली वारकरी धर्म स्वीकारला वारी स्वीकारणे तो त्याचा शिष्य होतो वारीला आल्यावर भजन कीर्तन प्रवचन इत्यादी ऐकतो या फळाचे नियंत्रण वारी प्रमुखाकडे असते म्हणजेच त्या फडाच्या प्रमुखाकडे असते आणि या काळात तो प्रमुख स्वतःची आणि त्याच्या आज्ञेने त्याच्या शिष्य मंडळींची प्रवचने, कीर्तने होतात. सर्व फडात श्री नामदेव महाराजांचा वास करांचा व देहूकर यांचा फड हे प्रमुख समजले जातात.
वारीमध्ये भजनाबरोबरच भारूड, संकीर्तन, धाव, फुगडी असे
विविध कार्यक्रम,खेळ होतात. रिंगण , धावा हि वारीतील प्रमुख वैशिष्ट्य आहेत. गोल रिंगण तसेच उभे रिंगण घातले जाते.
रिंगण - कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात श्रद्धाभाव आहे.
धावा-
धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याच घटनेची आठवण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.
वारकरी नेहमी कोणत्याही कामाची सुरुवात ही ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय’ असा जयघोष करून करतात. अश्या ह्या पालखी सोहळ्यात ‘ज्ञानोबा माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’
म्हणत; ‘निवृत्ती नामदेव सोपं मुक्ताबाई एकनाथ
नामदेव तुकाराम’ ह्या संतांचे स्मरण करत करत वारकरी पंढरपुरात पोहोचतात. आणि विठूमाऊलीला
भेटल्यावर प्रवासात झालेला शीण कुठल्या कुठे पळून जातो आणि ‘भाग गेला, शीण गेला | अवघा झालासे आनंद |’ असा भाव सर्व वारकऱ्यांच्या
चेहऱ्यावर दिसून येतो. आणि परत भेटीची आसा
मनात घेऊनच तो परत फिरतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा