हिंग
हिंगाची ओळख आणि वापर -
रोजच्या स्वयंपाकात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हिंग. हिंगाच्या फोडणीची चव, वास तर काही पदार्थाचा महत्त्वाचा घटक आहे. भाज्या, कोशिंबीरीबरोबरच लोणच्याची चव वाढवणारा हा पदार्थ. हिंगाचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. वात, वातामुळे पोट फुगणे, अपचन, पोटदुखी, मधुमेह, मूळव्याध इत्यादी सर्व आजारांवर घरघुती औषध म्हणून उपयोग होतो.
हिंगाचे उत्पादन -
भारतात हिंगाचा मोठ्या
प्रमाणात वापर होतो , विशेषतः दक्षिण
भारतात हिंगाचा वापर हा जास्त प्रमाणात होतो.
पण तरीही अजूनपर्यंत त्याचे उत्पादन हे भारतात केले जात नव्हते. भारतात वापरला जाणारा हिंग हा इराण, अफगाणिस्तान आणि काही प्रमाणात उज्बेकिस्तान
आणि कझाकिस्तानतून आयात होतो. भारतात मोठी
मागणी ही इराणी व पठाणी हिंगाला आहे. जगात
हिंगाचे उत्पादन ह्या मोजक्याच देशात होते. कारण त्याला लागणारे पोषक हवामान. हिंगाचे रोप हे थंड, कोरड्या (dry desert) हवामानात , वितळून जमिनीत
झिरपणाऱ्या बर्फाच्या पाण्यावर उत्तम वाढते.
मात्र २०२० च्या आसपास भारतातील पंजाब, लडाख, काश्मीर, हिमाचल प्रदेश, लाहौल-स्पिती परिसर या प्रदेशामध्ये हिंगाचे उत्पादन
घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला.
हिंग हा झाडाच्या मुळातून
स्रवणाऱ्या द्रवापासून बनवला जातो.
हिंगाच्या रोपाची उंची हि साधारण १ ते १.५ मीटर एवढी असते. हिंगाचे रोप
लावल्यानंतर साधारणपणे ४-५ वर्षानंतर त्याचे उत्पन्न मिळायला सुरुवात होते. म्हणजेच रोप लावल्या लावल्या लगेच उत्पादन मिळत
नाही. वनस्पती वर्गातील गाजर / मुळा
वर्गात हिंगाचे रोप येते. गाजर / मुळा
ह्यासारखे ह्याचे मुळ असते. झाडाची छाटणी
करून त्याच्या मुळाला वरुन आडवा काप दिला जातो.
त्यातून डिंकासारखा द्रव पाझरत असतो.
हवेमुळे तो कडक व्हायला लागतो. हा
कडक झालेला हिंग गोळा केला जातो आणि परत एकदा मुळाला छोटासा आडवा काप दिला जातो,
जिथून द्रव स्रवतो. ह्या कच्च्या स्थितीतील हिंगाचा वास फारच उग्र
व तीक्ष्ण असतो. त्याला सौम्य करण्यासाठी
त्यात मैदा / तांदुळाची पिठी, तेल घातले जाते
आणि त्याच्या वड्या पाडून उन्हात वाळवल्या जातात.
जागतिक बाजारपेठेत
हिंगाची किंमत खूप आहे. कारण हिंगाला
लागणारे पोषक असे वातावरण फारच कमी प्रदेशात आहे.
हिंगाचे उत्पादन हे प्रत्येक रोपाच्या मुळातून मिळणाऱ्या डिंकातून होते,
म्हणजेच फार कमी प्रमाणात उत्पादन होते. त्याच बरोबर जास्त प्रमाणात असलेली
जगभरातून मागणी. यामुळे त्याची किंमत अधिकच वाढते.
हिंग आणि भारत -
हिंगाचा उपयोग भारतात फार
पूर्वी पासून दिसून येतो. त्याचा हिंगु
असा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. मग मुख्य
प्रश्न हा पडतो कि, जर भारतात
हिंगाचे उत्पादन होत नव्हते तर मग त्याची ओळख भारतात कधी झाली? आयुर्वेद शास्त्र
हे साधारणपणे ३००० वर्षे जुने आहे असे समजले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा रेशीम मार्ग हा
साधारणपणे इ.स.पु. १५० वर्षांपासून होता. म्हणजे हा व्यापारी रेशीम मार्ग सुरु
व्हायच्या आधी हिंग भारतात आला होता का? ह्यावर जाणकारच उजेड टाकू शकतील. थोडक्यात इ.स.पूर्व काळापासून भारतात हिंग
आला होता.
हिंगाच्या वापराबद्दल
अभ्यास करताना असं दिसून येते कि, भारतात ह्याचा
वापर फार पूर्वीपासून होत होता. पण काहींच्या मते हिंगाचा उपयोग मध्ययुगीन काळात
सुरू झाला होता. तसेच ऐतिहासिक साहित्यात हिंगू म्हणून त्यांचा उल्लेख सापडतो.
परकीय आक्रमणात हा अफगाणिस्तानातून आलेला पदार्थ आहे, असे मानले
जाते.
आत्ताआत्तापर्यंत भारतात
काही जण हिंगाचा वापर शाकाहारी जेवणात करत नव्हते. का बरं असं होतं? ह्याचा मागोवा घेताना असं लक्षात आलं कि हिंग तयार
करण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्षात नाही पण अप्रत्यक्षात प्राण्यांच्या मांसाचा
स्पर्श हा हिंगांच्या द्रवाला होत होता.
कसं ते बघू.
हिंगाचे उत्पादन हे
मुख्यत्वे मध्य आशिया म्हणजे आताचे इराण, अफगाणिस्तान, उज्बेकिस्तान,
कझाकिस्तान , ताजिगिस्तान ह्या देशात केले जात होते. हिंगाचे रोप हे कोरड्या बर्फाळ उंच पर्वतांवर
निसर्गतः उगवलेले असते. त्याची लागवड केली जात नव्हती म्हणजेच नैसर्गिक रित्या जे
झाडं आले आहे त्यातूनच हिंग गोळा केले जात होते.
त्याच्या मुळातून स्रवणारा रस वाळवून हिंग तयार केला जातो. हा द्रव गोळा करण्याचे काम हे रानटी समुह करत
असत. झाडातून रस गोळा करण्याचा प्रक्रियेला लागणारा काळ हा बऱ्यापैकी जास्त असतो.
मग हे लोक ज्यांचं मुख्य अन्न शिकार आहे, ते शिकार करून प्राण्याच्या मांसाचा वापर हा खाण्यासाठी करायचे तर कातडीचा
वापर हा हिंगाचा द्रव गोळा करण्यासाठी
करत. पण भारतात शुद्ध शाकाहारी लोकांना हे मान्य नव्हते, त्यामुळे ते हिंगाचा वापर करत नसत, पण जे मांसाहारी
होते ते देखील पूजा करायची असेल तर हिंगाचा स्वयंपाकात वापर करत नसत. ह्याचा
उल्लेख हा भागवत पुराणात आढळतो. पण आता रस गोळा करण्यासाठी प्लॅस्टिकच्या
डब्ब्यांचा / कॅनचा उपयोग केला जातो. आता भारतातही हिंगाची शेती केली जाते.
खरंतर हे सगळं वाचल्यावर
काही लोकांना सहज आठवेल कि, त्यांच्या
लहानपणी हिंग हा प्रत्येकाच्या घरात उपलब्ध नव्हता. हळूहळू अनेक निषिद्ध पदार्थांचा स्वयंपाकघरात
प्रवेश होऊ लागला होता आणि त्याचवेळेस हिंगाने कधी स्वयंपाकघरात हळूच प्रवेश केला
हे लक्षात आलं नाही.



अभ्यासपूर्ण लेखन. चांगलं लिहिलं आहे
उत्तर द्याहटवाहिंग बद्दल इतकी माहिती प्रथमच वाचनात आली. विस्तृत माहिती, उत्तम लेखन आणि रचना.
उत्तर द्याहटवाउपयुक्त माहिती आहे छान लिहिलेस
उत्तर द्याहटवाछान माहितीपुर्ण लेख...
उत्तर द्याहटवाखूपच छान माहिती... धन्यवाद
उत्तर द्याहटवा