मराठी भाषा दिवस

 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी


कवी - सुरेश भट

खरं तर २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन आहे. पण आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आपण तो आज साजरा करत आहोत. मराठी भाषा साहित्य याविषयी आपण आज व्यक्त होणार आहोत.

आपण जे काही लक्षपुर्वक आणि अर्थबोध घेत वाचतो, मग ती एखादी कविता असो किंवा पुस्तक असो किंवा एखादा लेख असो त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो, आपल्या मनात झिरपतो. त्याविषयात आपण काही काळ राहतो, रेंगाळतो.

 

आज मराठी भाषा वारसा दिनी मी कोणती कविता / लेख / पुस्तक याविषयी काही सांगणार नाही.. मी आज थोडं वेगळं सांगणार आहे. तो विषय आहे अभिजात भाषा आणि ज्ञानपीठ पुरस्कार.  हा ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे भारतातील साहित्याला सर्वात मोठा पुरस्कार आहे.  

प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो आणि तो असायलाच हवा. आपण दुसऱ्या भाषेवर प्रेम करू शकतो, तिला आपली मानू शकतो पण खरी भक्ती, खरं प्रेम हे आपल्या मातृभाषेवरच करतो.

अभिजात भाषा

अभिजात भाषा हा दर्ज मिळण्याची गरज

आज पर्यंत तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या सहा भाषांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. तर हा अभिजात भाषेचा दर्जा का बर महत्त्वाचा ठरत असेल? हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.

 

Ø  या दर्जामुळे त्या भाषेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळते.

Ø  त्यामुळे भाषेची प्रतिष्ठा वाढते.  

Ø  भाषेच्या श्रेष्ठतेवर राज्य मान्यतेची मोहर उमटते म्हणजेच भाषेच्या सर्वांगीण विकास कार्यास अधिक चालना मिळते.

अकरा कोटी लोकांची मराठी जगातील दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे. आणि अशा भाषेला अब्ज्यात दर्जा मिळणे की मराठी माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाची व अर्थपूर्ण घटना ठरणार आहे.

 

अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत चे निकष

1. High antiquity of it's early text / recorded history over a period of 1500 to 2000 years.

2. A body of ancient literature / texts which is considered valuable Heritage by generation of speakers.

3. The literary tradition be original and not tomorrow from another speech community.

4. The Classical language and literature being distinct from modern, there may also be a discontinuity between the Classical language and its later form of its offshoots.

१. भाषेची प्राचीनता

२. भाषेची मौलिकता आणि सलगता

३. भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूषण

४. प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह असलेले नाते.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ दर्जाचे आहे ज्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे या भाषेला भाषिक आणि वांग्मयीन परंपरेचे स्वयंभूषण आहे आणि प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम आहे अशी भाषा म्हणजेच अभिजात भाषा होय.

प्राचीन महारठ्ठी, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची प्रचलित मराठी भाषा असा मराठी भाषेचा प्रवास आहे. महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि याची प्रचलित मराठी या तीन भाषा वेगवेगळ्या नसून त्या एकाच भाषेची तीन वेगवेगळे रुपये आहेत. या भाषेतील शब्दांपासून आजच्या प्रचलित मराठीतील शब्दांची उत्पत्ती झाली आहे.

मराठीच्या प्राचीनतेचा विचार करताना असे लक्षात येते की आज उपलब्ध असलेला गाथा सप्तशती (गाहा सत्तसई) हा ग्रंथ जो शालिवाहन राजा हाल (हल) सातवाहन राजा याने लोककव्यांचा आणि काही स्वरचित काव्यांचा केलेला संग्रह आहे. आणि याचा काय तो तो म्हणजे इसवी सनाचे पहिले शतक म्हणजे सुमारे दोन हजार वर्षे जुना.  याचा अर्थ असा मराठी भाषा ही २००० वर्षे किंवा २२०० वर्षे जुनी असल्याचा हा साहित्यिक पुरावा आहे.

महारठ्ठी असा उल्लेख ब्राह्मणी लिपीतील नाणेघाटातील असलेल्या शिलालेखात दिसतो. साई का 2000 ते २२०० वर्षांपूर्वीचा आहे.

महाराष्ट्राचा उल्लेख विनयपिटक दीपवंश महावंश या ग्रंथात येतो आणि त्याच्या काळ आहे इसवी सन पूर्व पहिलं शतक.

महाभारत, रामायण, गुणाढ्याच्या बृहत्कथा यामध्ये मराठी शब्द येतात तसेच संस्कृत महाकाव्यातही अनेक पात्रांच्या तोंडी प्राचीन मराठी संवाद येतात संस्कृत ही अभिजनांची भाषा तर प्राकृत ही सामान्य लोकांची भाषा हे सांगण्यासाठी प्राकृत भाषेचा उपयोग झालेला दिसतो प्राकृत म्हणजे तत्कालीन काळातील बोलीभाषा.  अभिजन वर्ग म्हणजे एक असा वर्ग जो सत्तेवर नेहमी वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतो नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि या अभियान वर्गाला बाकीचे लोक दपून असतात कारण या अभिजनांकडे सत्तेची ताकद असते.

मराठीचे वय अडीच हजार वर्षे असल्याचा पुरावा म्हणजे मराठी भाषेतील पहिला शिलालेख जो बावीस वर्षे पूर्वीचा आहे हा शिलालेख ब्राह्मणी लिपीत असून जुन्नर जवळील नाणेघाटात आहे या शिलालेखात 'महारठींनो' असा स्पष्ट उल्लेख आहे.  या शिलालेखाचा अनुवाद असा आहे - 'महारठी अंगिय कुलोत्पन्न गिरी समुद्रवलयांकित पृथ्वीवरील वीर श्रेष्ठ... महान अशा पुरुष श्रेष्ठ अशा...'.   या नोंदीवरून असे सिद्ध होते की महारठी भाषा बोलणारे ते महारठी लोक आणि ही भाषा बोलणाऱ्यांचा प्रदेश तो महारठी प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र प्रदेश.

मराठी भाषा उत्पत्ती विषयी -

उत्तरकालीन वैदिक मुलींचे व्याकरण रचून पाणिनीने तिला स्थिर व नियमबद्ध रूप दिले. तीच आपल्याला माहीत असलेली संस्कृत भाषा आहे. या भाषेत अनेक ग्रंथ रचले गेले आहे आणि ती विद्वानांची भाषा म्हणून मान्य झाली आहे. मात्र संस्कृत प्रस्थापित झाल्यानंतरही लोकांच्या बोलण्यातल्या पाणिनीपूर्वकालीन भाषा किंवा बोलीभाषा अस्तित्वात राहिल्या आणि त्यांचा विकास आणि विस्तार होत गेला. याच वेगवेगळ्या प्राकृत भाषा आहेत. या प्राकृत भाषांमध्येही ग्रंथरचना होऊ लागल्या आणि त्यांचेही व्याकरण तयार झाले. या प्राकृत भाषेचे पश्चिमेकडील प्राकृत आणि पूर्वेकडील प्राकृत असे दोन मुख्य प्रकार होते.  पश्चिमेकडील प्राकृत म्हणजे सौरसेने आणि पूर्वेकडील प्राकृत म्हणजे मागधी या दोन्हींच्यात आढळणारी प्राकृत म्हणजे अर्ध मागणी चा प्रदेश हा साधारण आजचा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राज्यात धर्मांचा मध्यवर्ती प्रदेश आहे. याच्या दक्षिणेकडील म्हणजे आजच्या मध्य प्रदेशातील दक्षिण भाग आणि महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील भाग या प्रदेशात महाराष्ट्र प्राकृतचा उदय झाला.

महाराष्ट्रचुडामणी -

महाराष्ट्री भाषेतील कर्पूरमंजिरी ग्रंथाचा रचिता राजशेखर आहे याचा काढा होऊ शकत आहे त्यांनी आपल्या पणजोबांचा उल्लेख महाराष्ट्र चुडामणी असा केला आहे याचा अर्थ महाराष्ट्री भाषेचा महापंडित. महाराष्ट्र भाषेचा पंडित हा महाराष्ट्रीयन असावा असा अनुमान काढता येतं आणि त्याही काळात ह्या महाराष्ट्री भाषेचा प्रवाह दिसून येतो.

गंमत म्हणून आपण आधी संस्कृत शब्द मग महाराष्ट्री प्राकृत भाषेतील शब्द आणि आत्ताच्या मराठी भाषेतील प्रचलित शब्द बघूया.

संस्कृत शब्द

महाराष्ट्री प्राकृत भाषेतील शब्द

आत्ताच्या मराठी भाषेतील प्रचलित शब्द

स्थान

ठाण

ठाण

कर्पूर

कर्पूर

कापूर

सप्त

सत्त

सात

नास्ति- णत्थि

नाथी

नाही

मेघ

मेह

मेघ

हृदय

हिअअ

हिय्या

देवकुळ

देअउळ

देऊळ

स्थान ठाण ठाण

कर्पूर कर्पूर कापूर

सप्त सत्त सात

नास्ति- णत्थि /नाथी -नाही

मेघ - मेह -मेघ

हृदय- हिअअ- हिय्या

देवकुळ-देअउळ-देऊळ

प्राकृत मधले काही शब्द कसे आले ते बघू

प्राकृत भाषेतील शब्द

आत्ताच्या मराठी भाषेतील प्रचलित शब्द

अत्ता

आत्या

कंजिअ

कांजी

खोक्खा

खोकला

बोल्ल

बोलणे

डोर

दोर

लडुक

लाडू

दाव

दाखवणे

अत्ता आत्या

कंजिअ कांजी

खोक्खा खोकला

बोल्ल बोलणे

डोर दोर

लडुक लाडू

दाव दाखवणे

यातून आपल्याला मराठी भाषेचे सातत्य दिसून येतात.

हे सातत्य सांगताना एक गंमत सांगते. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत. चिऊचं घर होतं मेणाचं काऊचं घर होतं शेणाचं तर ही गोष्ट आपल्याला बाराव्या शतकात म्हाइंभटाने रचलेल्या लीला चरित्रात दिसून येते. चक्रधरांनी धनाई नावाच्या एका हट्टी लहान मुलीला तिला उगी करण्यासाठी ही गोष्ट सांगितली. 'साळैचे घर मेणाचे. काउळाचे घर सेणाचे. पाउसाळां काउळेयाचे घर पुरे जाए. साळैचे वाचे.' तेराव्या शतकाच्या सुरुवातीची ही गोष्ट बीजरूपाने अजूनही आपण ऐकतो. आहे की नाही गंमत.

आता ज्ञानपीठ पुरस्कार ह्याविषयी –

हे झालं मराठी भाषा ही अभिजात भाषा का असावी ह्या विषयी. आता भारतीय भाषेतील साहित्याला केंद्र सरकारकडून मिळणारा सर्वोच्च पुरस्कार आहे तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.

पुरस्काराची सुरुवात –

रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. १९६५मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. ज्ञानपीठ पुरस्काराचे स्वरूप आहे - 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो.

पुरस्कारासाठीचे निकष -

Ø  भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

Ø  प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. 

Ø  ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. 

Ø  काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी ही रक्कम विभागून दिली जाते. 

वाग्देवीची प्रतिमा -


ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा (सरस्वती) ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने इ.स. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

आज पर्यंत मराठी साहित्याला चार वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार देताना प्रत्येक भाषेतील साहित्याचा अभ्यास केला जातो तसाच मराठी साहित्याचाही अभ्यास झाला हा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यामुळे मराठी साहित्य भारतात मोठ्या प्रमाणात पोहोचले असे म्हणावे लागेल. वि स खांडेकर यांनी 1959 साली प्रसिद्ध केलेल्या ययाती या कादंबरीला त्यांना 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला 1987 साली हा पुरस्कार मिळाला.  तर 2003 साली विंदा करंदीकर यांना अष्टदर्शने या अभंगात्मक लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. चवथा ज्ञानपीठ पुरस्कार 2014 साली मिळाला तो भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकाला.

तर एकूणच अभिजात भाषा हा दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळणे हे का महत्वाचे आहे हे लक्षात येते.  

अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३ वर आधारित

टिप्पण्या

  1. सुंदर कविता आणि त्यानुसार पुढचा लेख आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पुढाकाराची गरज आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा